- एक महिन्याचे मानधन देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानग्रस्त भागांत उपाययोजनेसाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचे महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी मंगळवारी दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा करून वरील निर्णय घेण्यात आला असल्याचे ढोरे यांनी सांगितले.
महापौर ढोरे म्हणाल्या की, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शहरे व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर मदतकार्य सुरू झाले आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी पालिकेची मदत पथके रवाना झाली आहेत. तसेच, नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन त्या कामासाठी दिले जाणार आहे. पालिकेत भाजपचे नगरसेवक व स्वीकृत ३ नगरसेवक, अपक्ष ७ नगरसेवक आहेत. दरमहा १५ हजारांचे मानधन तसेच ४०० रुपये सभा भत्ता नगरसेवकांना मिळतो. निधन झालेले २ नगरसेवक वगळून एकूण ८३ नगरसेवकांचे एकूण १२ लाख ७८ हजार २०० रुपये मानधन पूरग्रस्तांन दिले जाणार आहे.
















