- जोरदार पावसामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढून पुराचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा या तिन्ही नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासह पूर नियंत्रण कक्षाबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढून धरण भरल्यानंतर अतिरिक्त होणारे पाणी नदीत सोडले जाते. धरणात ज्यादा पाणी सोडल्याने नदी पात्रातील पाणी पातळी वाढून पुराचा धोका निर्माण होतो. शहरात पवना नदीकाठी चिंचवड, पिंपरी , कासारवाडी , पिंपळे गुरव , फुगेवाडी , दापोडी , सांगवी तर , मुळा नदीवर वाकड , पिंपळे निलख , सांगवी परिसराला पुराचा धोका आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच धोका टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यानुसार प्रभागनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके, कामांबाबत नियोजन, संबंधित विभाग, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, धरणाची स्थिती, शहरातील बाधित होणारी क्षेत्र आणि करावयाच्या उपाययोजनांची तयारी केली आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना अलर्ट राहून नागरिकांना वेळेवर मदत करण्याचे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
















