- व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे १२४ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पसंती क्रम जाणून घेत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी (दि. २८) तब्बल १२४ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. गुरुवारी (दि. २९) उर्वरित २३९ जणांचा पसंती क्रम जाणून घेत त्यांच्यादेखील बदल्या करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे आणि उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांनी कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या अडचणी व पसंती क्रम जाणून घेत बदल्यांचा निर्णय घेतला.
बुधवारी दुपारी प्रभारी अधिकाऱ्यांना लिंक पाठवून कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या पोलिस ठाण्याचे नाव सुचवल्यानंतर पोलिस आयुक्तांनी उपलब्धतता तपासून लगेचच बदलीचे आदेश दिले. एरवी इच्छितस्थळी बदली करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना बाबू लोकांना हाताशी धरून हेलपाटे मारावे लागत. मात्र, या वेळी झटपट निर्णय झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.
११ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या…
पोलिस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झालेल्या सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण अकरा पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि. २८) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक अजितकुमार खटाळ (दिघी ते हिंजवडी), उद्धव खाडे (हिंजवडी ते शिरगाव), शाहिद पठाण (देहूरोड ते वाहतूक विभाग), उपनिरीक्षक विद्या माने (दिघी ते आळंदी), विशाल दांडगे (चाकण ते भोसरी), दत्तात्रय मोरे (देहुरोड ते पिंपरी), अमरदीप पुजारी (एमआयडीसी भोसरी ते चिखली), बापू जोंधळे (आळंदी ते दिघी), विनोद शेंडकर (सांगवी ते चाकण), सचिन देशमुख (चिखली ते एमआयडीसी भोसरी) नंदराज गभाले (हिंजवडी ते दिघी)















