न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२१) :- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी २६ वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती. मात्र चायनीज तैपईच्या २७ वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर २१-१८, २१-१२ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. ही लढत तिने ४० मिनिटांत जिंकली.