- यमुनानगर पोलीस चौकीतील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- आरोपी हा त्याच्या पत्नीसह एकाविरोधात तक्रार देण्यासाठी यमुनानगर पोलीस चौकीत आला होता. त्याच्या विरोधात तक्रार का देत नाही म्हणून समजून सांगण्यासाठी आरोपीने त्याच्या पत्नीला चौकीच्या बाहेर नेले. तिथे त्याने पत्नीचा गळा दाबला. त्यावेळी पत्नीने आरडाओरड केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून चौकीतील फिर्यादी आणि मार्शलचे कर्मचारी बाहेर आले.
पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवून चौकीत नेले. त्यावेळी आरोपीने पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि पोलीस नाईक मुळे यांच्याशी झटापट करत त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस चौकीतील टेबलवर बसून खिडकीच्या काचा फोडल्या. स्वतःच्या हाताने काचा गळ्यावर मारून स्वतःला जखमी करून घेतले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यास फिर्यादी उपनिरीक्षक ओमासे यांना बाहेर आल्यावर सोडणार नाही, अशी धमकी दिली.
ही घटना रविवारी (दि. १) रात्री दोन वाजता यमुनानगर पोलीस चौकी येथे घडली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे यांनी निगडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.