- नगरसेवक शत्रुघ्न काटेंकडून अधिकाऱ्यांना तंबी..
- विदुयत पुरवठ्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याच्या केल्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :-पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंटचे रस्ते व इतर विकासकामे सुरु आहेत. प्रगतीपथावरील कामांमुळं विशेषतः विद्युतच्या कामांमुळे प्रभागात अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. नागरिकांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विद्युत विभाग आणि स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा केली. प्रभागात विद्युत पुरवठा विस्कळीत होणार नाही याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
नगरसेवक शत्रुघ्न काटे न्यूज पीसीएमसीशी बोलताना म्हणाले, पिंपळे सौदागरमधुन आयटी हबमध्ये काम करणारा मोठा वर्ग आहे. सध्या कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे काम घरूनच करावे लागत आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही सुरूच आहेत. मात्र प्रभागातील व स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेकदा वीजप्रवाह खंडित होतोय. याबाबत स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता, महावितरणाचे कनिष्ठ अभियंता, पालिकेचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन कामे करताना विदुयत पुरवठा जास्त वेळ खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. तसेच स्मार्ट सिटी व इतर अनुषंगिक कामांना वेग देण्याबाबत त्यांच्याकडे मागणी केली. अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले असल्याचे काटे यांनी सांगितले.
या बैठकीत नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, महावितरणाचे कनिष्ठ अभियंता मनोज पुरोहित, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, प्रकल्प व्यवस्थापक टी. के. चव्हाण, इलेक्ट्रीक डिपार्टमेंटचे एस. ए. वारे, स्वामी व प्रविण सुरनार आदी उपस्थित होते.