- पूर्वीचे ४० जणांचे पॅनल रद्द; यापुढे कामानुसार होणार वर्गवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सल्लागार व वास्तुविशारद यांचे ४० जणांचे पॅनल रद्द केले आहे. यापुढे सल्लागारांची नेमणूक पाच कोटींपेक्षा जास्त रकमेच्या जास्त खर्चाच्या कामांसाठी, तर वास्तुविशारदांची नेमणूक दोन कोटींपेक्षा कामांकरिताच केली जाणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामाच्या प्रकारानुसार तीन वर्षांसाठी ही नियुक्ती होणार आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. सल्लागारांची नेमणूक करताना इमारत बांधकाम, रस्ते बांधकाम, नदीवरील पूल, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, लोहमार्गावरील पूल, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, उद्यान विभागाअंतर्गत स्थापत्य, आर्किटेक्ट, हॉर्टिकल्चर संयुक्त उपक्रम, विद्युत, पर्यावरण विभागाअंतर्गत स्थापत्य, पर्यावरण विशेषज्ञ, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन प्रकल्प असे कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच कामाच्या रकमेनुसार तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ५ ते २० कोटी, २० ते ५० कोटी आणि ५० कोटींपुढील कामांचा समावेश असणार आहे.
वास्तुविशारदाची नेमणूक करताना इभारत व आंतरिक रचना, आराखडा, उद्यान आणि लॅण्डस्केपिंग, शहरी रस्त्यांची रचना किंवा आराखडा असे कामांचे वर्गीकरण केले आहे. तसेच कामाच्या रकमेनुसार चार श्रेणी केल्या आहेत. त्यामध्ये २ ते ५ कोटी, ५ ते २० कोटी, २० ते ५० कोटी आणि ५० कोटींपुढील कामांचा समावेश असणार आहे. सल्लागार , वास्तुविशारदांना कोणत्याही प्रकारच्या श्रेणीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यांना या क्षेत्रातील कामाचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.