- १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली; भारताच्या झोळीत सुवर्णपदक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.
भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५ v मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.












