न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. त्याचे औपचारिक उदघाटन चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बुधवार (दि. ९) रोजी पार पडले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चौबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील विविध शाखा, नियंत्रण कक्षाच्या पाहणीनंतर आयुक्त दालनात चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी आयुक्तालयाच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. आयुक्त म्हणाले की, आयुक्तालयासाठी ४ हजार ६०० पदे मंजूर झाली आहेत. सध्या केवळ २ हजार कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत.
चाळीस लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या शहराच्या सुरक्षेसाठी केवळ दोन हजार पोलीस काम करत आहेत. आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली असली तरी, ती भाडेतत्वावर वापरण्यासाठी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी १०० एकर जमिनीची मुख्यमंत्र्यांनी उपलब्धता करण्याची मागणी, पद्मनाभन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.











