न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- येत्या पंधरा दिवसात शास्तीचा निर्णय मंत्रीमंडळात मी घेईन. शास्तीच्या संदर्भात सामान्य मानसाला दिलासा मिळाला पाहिजे. यातून अनधिकृत बांधकामाला समर्थन देतोय, अशी परिस्थिती येऊ नये, याची देखील काळजी घेतली जाईल. अनधिकृत बांधकामाचे समर्थन करणे चुकीचे आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्याबाबत मी स्वतः लक्ष घातले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील विविध विकासकामांचे आज बुधवार (दि. ९) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ई-भूमिपुजन’ करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चौबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर,यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या च-होलीतील (१४४२ सदनिका), रावेत (९३४), मोशी – बो-हाडेवाडी( १२८८) व इतर कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.











