- त्या बदल्यात गरजूंना ट्रस्टकडून डायलिसीस उपचार मोफत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- थेरगावात पालिकेकडून नव्याने रुग्णालय बांधण्यात आले आहे. त्या रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून डायलिसीसच्या ७ अत्याधुनिक मशिन बसविण्यात येणार आहेत. या मशिन बसवून शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार सेवा दिले जाणार आहे. त्यासाठी संस्थेला जागा, वीज व पाणी मोफत देण्यास स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळी मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नितीन लांडगे होते.
ओम जय आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डांगे चौक, थेरगाव येथे गरीब रुग्णांसाठी गेल्या ४ वर्षापासून डायलिसीस सेंटर सुरू आहे. पालिकेच्या रुग्णालयात मोफत सेवा देण्यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला होता. राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य विमा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा रुग्णांना लाभ मिळून डायलिसीस मोफत होणार आहे.
ज्या रुग्णांचा कोणत्याही शासकीय योजनेत समावेश नाही. अर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत डायलिसीससेवा संस्था देणार आहे. संस्थेला थेरगावच्या रुग्णालयात डायलिसीस सेंटरसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, मोफत वीज व पाणी महापालिका पुरविणार आहे. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. धोरणात्मक विषय असल्याने पालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.