न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- हेल्मेट सक्तीबाबत केंद्र सरकारने कायदा करून, त्याचे पालन करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, यास राज्यात हारताळ फासला जात असल्याचे दिसून येते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी प्रदीप बेळगांवकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात म्हटले आहे की, पुण्यातील अनेक वृत्तपत्रातून हडपसर येथे हेल्मेट न घातल्याने दि. (०५/०१/२०१९) रोजी एकाचा मृत्यू ही बातमी ऐकल्यावर मन सुन्न झाले. जो मुलगा आपल्या घरच्या आई वडिलांचा आधारवड होता तोच निघून गेल्याने त्या आई-वडिलांनी करायचे काय? कुणाकडे पहायचे? ही बाब आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पडणारी आहे. दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन, मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण राज्यात खूपच जास्त आहे. याबाबत रवी शेखर भारद्वाज व Ors विरुद्ध पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य (दि. १६ जुलै २००३) बेंच मा. न्या. सी. ठक्कर व मा. न्या. व्ही. ताहिलरामाणी या उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला आहे.
पुण्यात हेल्मेट सक्तीस विरोध करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची कीव करावीशी वाटते. कारण केवळ मतदारांच्या मतांचा राजकीय लाभ घेण्यासाठी ही मंडळी सरसावली आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. केवळ मतांसाठी विरोध करणे ही प्रवृत्ती समाजहिताच्या दृष्टीने घातक आहे. आपण याबाबत जातीने लक्ष घालून, संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.
अन्यथा मा. न्यायालायाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेते मंडळी यांना सहा ते सात वर्षांची निवडणूक लढविण्यास बंदी घाला, अशी मी या प्रश्नाबाबत मा. उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणार असल्याचा इशारा प्रदीप बेळगांवकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.











