- स्वी. नगरसेवक यादव यांच्या प्रयत्नास यश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १० जाने.) :- चिखली-कुदळवाडी परिसरातील मुख्य चौकात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती. आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना वाहतुकीच्या रहदारीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे चिखली व परिसरातील वाहतूककोंडी सोडवावी. तसेच चिखली चौक, कुदळवाडी चौक, मोईफाटा चौक या भागातील वाहतूक नियंत्रक दिवे चालू करण्यात यावे. याकरीता स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिस उपायुक्तांकडे मागणीचे निवेदन दिले होते.
या मागणीची दखल घेत वाहतूक विभागाचे प्रमुख भोसले यांनी स्वी. नगरसेवक यादव यांना बोलावून त्यांच्या सूचना व हरकती जाणून घेतल्या व लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.
प्रशासनाकडून चिखली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व सिग्नल चालू करण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलीस देखील तैनात केले आहेत. त्यामुळे चिखली व कुदळवाडी परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे, यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.











