- संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महापालिकेसमोर टाळ-कुटो आंदोलन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’ च्या कामात आणि महापालिकेच्या विविध विकासकामात सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती विठ्ठल-रुक्मिणी मुर्ती खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा चुनावी जुमला बनविलेल्या सत्ताधारी भाजपचे हात भ्रष्टाचारात अडकले असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला आहे.
आज गुरुवार (दि. १०) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर टाळ-कुटो आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मोरवाडीतील अहिल्याबाई पुतळ्यापासून ते महापालिका भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका उषा काळे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, निकिता कदम यांच्यासह युवक कार्यकर्ते व पदाधिकारी आदी सहभागी झाले होते.
सत्ताधारी भाजपकडून संत संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात टाळ-कुटो आंदोलन करण्यात आले. ‘संतपीठात पैशे खाणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’, ‘विकास कामात कमिशन खाणाऱ्या आयुक्तांचा निषेध असो’, ‘स्थायी समिती सभापतीचा निषेध असो’, ‘सत्ताधारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशाही घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.











