न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा सांप्रदायीक वारसा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चिरंतन टिकण्यासाठी टाळगाव चिखलीत संतपीठ उभारण्यात येणार आहे. या संतपीठ उभारणीच्या निविदा ११.१६ टक्के वाढीव दराने भरलेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी ही निविदा रद्द करून पुनर्निविदा मागवावी.
तसेच मनपाच्या वतीने संतपीठाच्या तज्ञ समितीची नियुक्त करण्यात येत आहे. या समितीवर आयुक्त श्रावण हार्डीकर यांची पदसिध्द अध्यक्ष तथा संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासह या समितीमध्ये महापालिकेचे अधिकारी व इतर संत साहित्यिकांचा समावेश आहे. याबरोबरच या संतपीठामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे हभप. धर्मशाळा प्रमुख, दिंडीप्रमुख व आदींचा समवेश असणे जरुरीचे आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका अनुराधा गोफणे, निकिता कदम, प्रशांत शितोळे, फजल शेख, पंकज भालेकर, आनंदा यादव आदी उपस्थित होते.
यात म्हटले आहे की, नवनिर्मित जगतगुरू संत तुकाराम महाराज संत पिठाची उभारणी व कामकाजासाठी पिंपरी चिंचवड मनपाने स्थापन केलेल्या समितीवर प्रामुख्याने हभप. बंडातात्या कराडकर, कुऱ्हेकर महाराज, गाथा मंदिराचे प्रमुख हभप. पांडुरंग महाराज घुले, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप. बाळासाहेब काशीद. तसेच तळवडे, चिखली, मोशी, डूडूळगाव, चऱ्होली, दिघी, पिंपरी चिंचवड, देहू, आळंदी, भोसरी पंचक्रोशीतील दिंडीप्रमुख यांचा समावेश असावा. वारकरी संप्रदायातील स्थानिक प्रमुख, ज्यांचा संप्रदाय व संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या नियोजनामागे नेहमी पुढाकार असतो. त्यांच्या प्रमुखांचाही या संतपीठ समितीमध्ये समावेश करण्याबाबत, आयुक्तांनी विचार करण्याची मागणीही वाकडकर यांनी आयुक्तांना या निवेदनाद्वारे केली आहे.











