न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- काही खेळांडूमध्ये कौशल्य असतानाही, त्या क्रीडा प्रकारांमधील सुविधा, व्यासपीठ आणि साहित्य उपलब्ध नसल्याने खेळाडूंना त्या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध होत नाही. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार खेळ आणि त्या पद्धतीच्या सुविधा केवळ मुंबई, कोलकाता, बंगलोर आदी मोठ्या शहरांतच उपलब्ध आहेत.
ठाण्यातील अंबरनाथ महापालिकेने निर्माण केलेली रायफल शुटिंग रेंज (१५ रेंज १० मीटर) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची महाराष्ट्रातील पहिली शूटिंग रेंज आहे. या शूटिंग रेंजमुळे ठाण्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होणार आहेत. जर ठाणे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शुटींग रेजची स्थापना करू शकते तर, आशिया खंडातील श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिका मागे का?
पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना सरावासाठी शहरापासून दूर असलेल्या बालेवाडी येथे जावे लागते. त्यात खर्ची होणारा वेळ तसेच तेथे शहरातील खेळाडूंना मिळणारी सापत्नपणाची वागणूक आदींचा विचार करीत महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शुटींग रेंज स्थापन करावे. याबाबत शिवसेना संपर्कप्रमुख तिरोडा-गोरेगाव तथा प्रदेश अध्यक्ष, शिवशाही व्यापारीसंघाचे युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे की, आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका म्हणुन ओळखली जाते. आपल्या शहारामध्ये विविध जिल्ह्यातून नागरिक वास्तव्यास येतात. त्यात प्रतिभावान खेळाडूंचा भरणाही अधिक असतो. तसेच पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील खेळाडूंसाठी व पोलिसांकरीता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटींग रेंज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, प्रामुख्याने राहटणी-काळेवाडी परिसरात उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नावलौकिकात आणखी भर पडेल. त्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, दाखले यांनी या निवेदनात नमूद केले आहे.











