न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- लोकसभेच्या निवडणूका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारण आहे, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार. पार्थ मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आज गुरुवार (दि. १०) रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटक गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, युवा नेते जितेंद्र ननावरे, रोमी संधू, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, आदी उपस्थित होते.
खासदार बारणे यांना पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी बिनधास्तपणे प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, कोण पार्थ पवार…? मी ओळखत नाही. केवळ अजित पवारांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख आहे. स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पार्थ याला फ्लेक्सवर झळकावे लागत आहे. कुणीही दुसरा पवार समोर आला तरी मला काहीच फरक पडत नाही. गेल्या साडेचार वर्षात केलेले काम, आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मावळचा पुन्हा एकदा खासदार मीच होणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.











