न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध कामांचा तसेच नगरसेवकांच्या कामगिरीचे अवलोकन करण्यासठी राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांना बारामती गेस्ट हाउस येथे बुधवार (दि. ९) रोजी बोलावले होते.
यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, सत्ताधारी भाजप पालिकेत मनमानी पद्धतीने काम करीत आहे. चुकीचे कामकाज करून नागरिकांच्या कररूपी पैशांचा अपव्यय करीत आहे. त्यामुळे सत्ताधा-यांच्या विरोधात आक्रमक व्हा. समन्वयाने चुकीच्या कामांना विरोध करा. पक्षाने केलेले सकारात्मक कामे जनतेपर्यंत पोहोचवा. आगामी लोकसभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना एका छताखाली आणा. पक्षापासून दुरावलेल्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा. गट-तट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल, असा सज्जड दम पक्षाच्या बैठकीत उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी दिला आहे.











