- पत्रकार अमोल सहारे खडकी भूषण पुरस्काराने सन्मानित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- लॉकडाउनच्या काळामध्ये सर्वांनी आपापल्या परीने गरजूंना तळागाळातील लोकांना मदत केली, ज्यांना मदत केली ते गरजू होते, त्यांच्यावर वाईट वेळ आली होती, मात्र त्यांच्यासोबत आम्ही आहोत असे गौरवोद्गार दाक्षिणात्य फिल्म अभिनेते देव गिल यांनी काढले.
इंदिरा कल्याण केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस खडकी भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गिल बोलत होते. कार्यक्रमामध्ये बालकलाकार आर्या घारे तसेच बड्डे आहे भावाचा फ्रेम शिखर गायकवाड उपस्थित होते. आईवडिलांनी आपल्या मुलांचा कल ओळखून त्यांना त्यात्या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन करावे. मुलांनीदेखील सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवून देशाची आणि आपल्या पालकांचे नाव उंच करावे असे गिल म्हणाले. कार्यक्रमामध्ये बड्डे आहे भावाचा हे गाणे गाऊन गायकवाड यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमामध्ये गिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अमोल सहारे (निर्भीड पत्रकार दैनिक पुढारी), सागर आव्हाड (साम टीव्ही), अंजुम मणियार (कोरोना योद्धा), गणेश कांबळे (न्यूज २४ तास), कलिंदर शेख (यूट्यूब चॅनल), दिलीप दहाडे (संपादक), वाजिद शेख (सामाजिक कार्यकर्ता), डॉ. अभिजीत सोनवणे (भिक्षेकऱ्यांची डॉक्टर), अनिल जाधव (साहित्यिक लेखक), आफताब शेख (सर्पमित्र), मोहम्मद खान (कोरोना योद्धा), नईम शेख (कोरोना योद्धा) यांना खडकी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल अनिल पालांडे, पोलिस निरीक्षक अनिल पवार, माजी सदस्य तुषार गांधी, अंजुन इनामदार, मनीष आनंद, पुजा आनंद, जफर चौधरी, समीर चौधरी, मेहबूब पिरजादे, सय्यद हलीम, फिरोज शेख, जहीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अझहर खान तर सूत्रसंचालन सुनील तुंगतकर यांनी केले.