- मनोवैज्ञानिक चाचणी व समुपदेशनाद्वारे पोलीस आयुक्तालय मिळवून देतयं रोजगार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील सुशिक्षित विधीसंघर्षित बालकांना तेरे देस होम्स, जर्मनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिंचवडच्या चापेकर चौकातील मुख्य वाहतूक कार्यालयात मनोवैज्ञानिक चाचणी व समुपदेशन व कल तपासून निवड होणाऱ्या तरुणांना विविध व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे नकळत गुन्हेगारी मार्गावर गेलेले विधीसंघर्षित बालक यांचे मानसोपचार तज्ञांकडून मनोवैज्ञानिक चाचणीव्दारे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून ही बालके भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता वस्ती पातळीवरील इतर मुलांसाठी आदर्श तयार करतील.
या अनुषंगाने प्रथम टप्यात निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी, वाकड व तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यातील सुशिक्षित विधीसंघर्षित बालकांना तेरे देस होम्स, जर्मनी ही सामाजिक संस्था प्रकल्पातील व्यवसायिक समुपदेशकांशी सांगड घालून प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. त्यांच्यातील क्षमता, आवड व कौशल्य जाणून घेवून प्राप्त माहितीच्या आधारे या मुलांसाठी मोफत व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
हे ४ दिवसीय शिबिर १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२१ दरम्यान आयोजित केले होते. पहिल्या टप्यात ३५ सूशिक्षित (किमान १० वी उत्तीर्ण) विधीसंघर्षित बालकांपैकी १९ विधीसंघर्षित बालकांची मनौवेज्ञाणिक चाचणी पुर्ण झालेली आहे. उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व बालकांच्या चाचण्या पुर्ण झाल्यावर त्यांना कोहीनूर इन्स्टीट्युट, चिंचवड येथे व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधी दरम्यान मुलांना प्रवास भत्ता व प्रोत्साहनपर भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या बालकांसाठी रोजगार मेळावा आयोजित करुन विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
















