- सत्ताधारी आमदारांचे स्थायीच्या भ्रष्टाचाराला समर्थन लाजिरवाणे..
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२१) :- महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्टाचारावरून शहर राष्ट्रवादीने जोरदार हल्ला सुरू केला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या कसरती सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. महापालिका स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी रंगेहाय पकडले. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.
भाजपने ‘ना भय ना भ्रष्टाचारा’चे वचन देऊन महापालिकेची सत्ता मिळविली. मात्र, गेल्या साडेचार वर्षात भ्रष्टाचार आणि भय सुरू केले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाचप्रकरणी एसीबीने धाड टाकत स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना पालिकेतून अटक केली. यामध्ये काय तरी गूढ आहे, असे असताना भाजप आमदारांनी स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करणे लाजिरवाणे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेल, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, कालच्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिलेल्या सर्व विषयांना स्थगिती देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीने बेस्ट सिटी म्हणून शहराची ओळख देशात निर्माण केली. तर, भाजपने पाच वर्षात भ्रष्टाचारी शहर अशी ओळख केली आहे.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, काही तरी गूढ असल्यामुळेच न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असेल. दोनही आमदार स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतात, हे लाजिरवाणे आहे. आमदारांना आता सांगायला काही राहिले नाही.
प्रशांत शितोळे म्हणाले, भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. आमच्यावर खरेदीत काही नसताना खोटेनाटे आरोप केले. भाजपच्या राजवटीत महापालिकेत पोलिसांनी महापालिकेत येऊन कारवाई केली. लाच घेताना स्थायी समिती स्वीय सहाय्यक याना पकडले आहे. यापेक्षा वेगळा पुरावा काय हवा.
















