- मात्र, रुग्णालयाकडून साफ इन्कार; मृत महिलेच्या मुली झाल्या अनाथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, वायसीएम रुग्णालयाकडून आरोप फेटाळण्यात आले असून, आम्ही योग्य उपचार केले असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सपना कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना चार मुली असून मुलींच्या वडिलांचे या अगोदरच निधन झालेले असल्याने, मुली अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णालयाकडून योग्य ते उपचार न झाल्याने सपना यांचा आज सकाळी मृत्यू झाला, असा आरोप सपना कांबळे यांची बहीण अर्चना ताकतोडे यांनी केला आहे. तसेच, सपना यांना हृदयाचा कोणताही आजार नव्हता, असं देखील अर्चना ताकतोडे यांनी सांगितलं आहे. तर, रुग्णालयाकडून त्यांचं हृदय प्रतिसाद देत नव्हतं, त्यांचं ब्लडिंग खूप झालं होतं. त्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्या होत्या, अशी माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली आहे.











