- चाकण एमआयडीसी फेज तीन उद्योजक संघटनेने जपली सलग दुसऱ्यांना रक्तदानाची परंपरा..
- महारक्तदान शिबिरात तब्बल दीडशेपेक्षा अधिक रक्तदात्यांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२१) :- गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, आता उद्योजकदेखील या सामाजिक कार्यात जबाबदारीचे भान ठेवत पुढाकार घेताना दिसत आहेत. चाकण एमआयडीसी फेज तीन उद्योजक संघटनेने आपली परंपरा कायम ठेवत, चाकण येथील अमेया इंडस्ट्रीजच्या वर्धापनदिनी व कंपनीचे मालक किसन गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शुक्रवारी (दि. २०) रोजी महारक्तदान शिबीरचे आयोजन केलं होतं. या महारक्तदान शिबिरात तब्बल दीडशेपेक्षा अधिक जणांनी रक्तदान करून रक्त संकलित केले. गतवर्षीदेखील संघटनेच्या या उपक्रमात १०१ बाटल्या रक्त संकलित झाले होते.
कोविड महामारीच्या काळात आणीबाणीमुळे राज्यासकट पूर्ण पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. उद्योजकांच्या या रक्तदान शिबिरात अक्षरक्ष: लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, त्याप्रमाणे रक्तदात्यांनी रांगा लावून रक्तदान केले. यावेळी चाकण एमआयडीसी फेज तीन उद्योजक संघटनेचे अध्यक्ष तथा सहयाद्री इंडस्ट्रीजचे संचालक जयदेव अक्कलकोटे, अमेया इंडस्ट्रीजचे किसन गायकवाड, संघटनेचे संचालक, पदाधिकारी व कमर्चारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे म्हणाले, ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी, सध्या रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा केला जाऊ शकत नाही. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाही. ही शोकांतिका आहे. रक्तपेढ्यांना हातभार लागावा या उद्देशाने संघटनेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात संघटनेतील कंपन्यांचे मालक, त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. संघटनेबाहेरील उद्योजकांनी व त्यांच्या कर्मचार्यांनी देखील रक्तदान करून या सत्कर्मास हातभार लावला. या शिबिरात १५३ जणांनी रक्तदान करून रक्त संकलित केले. गतवर्षी एसेंट प्रिसिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यात शंभरपेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलित झालं होतं. यापुढे देखील हा दानक्रम सुरुच ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या रक्तदान शिबिरात जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले.











