- वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांना नाहक त्रास..
- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२१) :- हिंजवडी येथील आयटी पार्कमधील बहुतांश कंपन्या बंद असताना पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्यावर सावित्रीबाई फुले उद्यान ते कोकणे चौकपर्यंत वाहनांची लांबचलांब रांग लागलेली असते. कर्मचा-यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना देखील या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. शिवार चौक आणि विशालनगर चौकातील सिग्नलच्या मीनिटांमध्ये तांत्रीक घोळ असल्यामुळे या वाहतूक कोंडीत भर पढत असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस अधिका-यांनी यात लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्बंधानंतर हिंजवडी येथील बहुतांश आयटी कंपन्या गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. कर्मचा-यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणा-या येणा-या गाड्यांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याएवढी आहे. तरी देखील पिंपळे सौदागर ते जगताप डेअरीमार्गे हिंजवडी जाणा-या रस्त्यावर वाहनांची खूपच वर्दळ आहे. या मार्गावर विशालनगर येथील सवित्रीबाई फुले उद्यान ते पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापर्यंत वाहनांची मोठी रांग लागलेली असते. ही वाहतूक कोंडी दररोज होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. औंध-रावेत मार्गावरील जगताप डेअरी चौकात उड्डाण पूल उभारून देखील या वाहतूक कोंडीवर कसलाच सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही.
आयटी पार्क बंद असताना या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. उद्या कंपन्या सुरू झाल्यांतर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करणार आहेत. त्यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्यामुळे वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी वाहनचालकांनाच कसरत करावी लागत आहे. शिवार चौक आणि विशालनगर येथील चौकातील सिग्नलच्या वेळांमध्ये तांत्रीक नादुरूस्ती असल्यामुळे याठिकाणी कोंडी होत आहे. सिग्लनच्या वेळा बदलल्यानंतरच कोंडी फोडता येणार आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस कर्मचा-यांनी लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी काटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.











