- पिंपरी – चिंचवड आरटीओ बनले ‘टेक्नोसेव्ही’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहन चालविण्याचे परवाने ऑनलाइन पद्धतीने दिले जात आहेत. मात्र, वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित डॉक्टरांना थेट ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑनलाइन लायसन्स वितरित केले जात आहेत. शिकाऊ परवानादेखील ऑनलाइन पद्धतीने दिले जात आहे. त्यामुळे घरबसल्या परवाना मिळणे शक्य झाले आहे. अनेकांना त्यांचे लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. त्याचीही ऑनलाइन सुविधा आहे. चाळिशीनंतर लायसन्स नूतनीकरणासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
नवीन लायसन्स किंवा नूतनीकरणासाठी एमबीबीएस शिक्षण असलेल्या डॉक्टरकडील तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र अर्जदारांना सादर करावे लागणार आहे. असे डॉक्टर सहज उपलब्ध व्हावेत तसेच वेळेची बचत व्हावी यासाठी परिवहन विभागाने काही डॉक्टरांना थेट परिवहन विभागाच्या वेबसाईटशी कनेक्ट केले आहे. या डॉक्टरांना थेट वेबसाईटवर संबंधित अर्जदारांचे प्रमापत्र सादर करता येणार आहे. प्रत्येक डॉक्टर दिवसाला २० प्रमाणपत्र देऊ शकणार आहेत.











