- विषय दुसऱ्यांदा दप्तरी दाखल; मनुष्यबळालाच पुन्हा प्राधान्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- शहरातील १८ मीटर व त्यापुढील रस्त्यांची सफाई यांत्रिक (रोड स्वीपर मशिन) पद्धतीने केली जाणार नाही. त्या कामासाठी मनुष्यबळ लावले जाणार आहे. गरज पडल्यास नागरी वस्तीतील छोट्या रस्त्यांच्या साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा विचार केला जाईल, असे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी सांगितले.
शहरातील १८ मीटर व त्यापुढील एकूण ९२८.२५ किलोमीटर अंतराचे रस्ते रोड स्वीपर मशिनने स्वच्छ करण्याच्या ७ वर्षे कालावधीच्या कामासाठी एकूण ४६३ कोटी ९४ लाख खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्तास मंजुरीसाठी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसमोर होता. मागील सभेत तो प्रस्ताव तहकूब करण्यात आला. शुक्रवारच्या सभेत तो विषय दुसऱ्यांदा दप्तरी दाखल करण्यात आला. या संदर्भात ते बोलत होते.
ढाके म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणात प्रशस्त रस्ते आहेत. संपूर्ण रस्त्यावर कचरा जमा न होता तो कडेला जमा होतो. त्यामुळे मनुष्यबळाद्वारे रस्त्यांच्या कडेचा कचरा काढणे शक्य आहे. यांत्रिक पद्धतीने काम केल्यास शेकडो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने साफसफाईचे काम शहरात केले जाणार नाही. मनुष्यबळाद्वारे रस्ते सफाईची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गरज पडल्यास नागरीवस्तीतील अंतर्गत छोट्या रस्त्यांसाठी यांत्रिक पद्धतीचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ५ महिन्यांपूर्वीही यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचा विषय सर्वसाधारण सभेसमोर आला होता. त्या वेळी तो दप्तरी दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा तो सभेसमोर ठेवण्यात आला होता. तो पुन्हा दप्तरी दाखल करण्यात आला आहे.











