- राष्ट्रवादीकडून दबावतंत्राचा अवलंब?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील एकूण १८ महापालिकांमध्ये ३१ डिसेंबर २०१९ च्या कायद्यानुसार एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने निवडणूक घेण्याचे आणि त्या दृष्टीने कामकाज सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यासाठी आज शुकवारी महापालिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ झाला आहे.
दोन नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभागाची रचना असावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. द्विसदस्यीय पद्धत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल ठरत असल्याने याच पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. काँग्रेसलाही दोन नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना मान्य असून ती काँग्रेससाठी फायदेशीर ठरत असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये दोन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक होण्याची अधिक शक्यता असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.