- तोतया वकीलासह एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२१) :- ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी फिर्यादी गेले असता तिथे त्यांची आरोपींसोबत ओळख झाली. त्यातील एकजण वकील असल्याचे सांगून तुमचे दस्त करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत ओळख वाढवून स्वतः वकील नसतानाही फिर्यादी यांना तसे भासविले.
फिर्यादी यांचे मांजरी बुद्रुक येथील शारदा कॉम्प्लेक्स व शारदा सुमन आर्केड या बिल्डिंग मधील १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून सातबारा उतारा, आठ (अ) उतारा, फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेतले. सात फ्लॅटचे १८ आणि १९ मे या दोन दिवसात दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक २५, दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीचे कागदपत्र बनवून त्याचा वापर करून रजिस्ट्रेशन करून फिर्यादीची १३ लाख आठ हजारांची फसवणूक केली.
ही घटना १८ आणि १९ मे २०२१ रोजी घडली. अमित दत्तात्रय घुले (वय ४२, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. २६) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रसन्न शिरुडकर (वय ४१), शर्वरी प्रसन्न शिरुडकर (वय ४०, दोघे रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












