न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- खासदारकीची हँटट्रिक केलेले शिरूरमधील शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून कोणी लढण्यासच तयार नसल्याने अजितदादांनीच तेथून लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते. ते आव्हान आढळरावदादांनी स्वीकारलेच.
दरम्यान, शिवसेनेचचाच खासदार असलेल्या मावळमधून पार्थ पवार यांचे नाव अजित पवारांनी सुचवले होते. मतदारसंघात त्यांची पोस्टर्स लागली आहेत. कार्यक्रमालाही ते येऊ लागले आहेत. परिणामी ही चर्चा आणखी रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरूवार (दि. १०) रोजी पत्रकार परिषदेत ‘कोण हा पार्थ पवार?’ ‘मी त्याला ओळखत नाही’. ‘असे विधान केले होते. ते विधान राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खोडून काढले आहे.
याबाबत बोलताना साने म्हणाले की, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अजित पवार यांच्या आशिर्वादानेच त्यांना स्थायीचे अध्यक्षपद मिळाले.
या पदावर राहून त्यांनी मलिदा लाटला. शिवसेनेचा गटनेता असतानासुध्दा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना बारणेंना सांभाळून घेतले. त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागातील कामांना अजितदादांनी प्रथम प्राधान्य देऊन कामे मार्गी लावण्यास मदत केली. त्यावेळी बारणेंना अजितदादांची आणि शरद पवारांची ओळख पटली नाही का? बारणे यांना लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार जड जाणार आहे. त्यामुळे बारणे अस्वस्थ झाले असून, ही अस्वस्थता आता बाहेर पाडू लागली आहे. समोर पराभव दिसत असताना बारणें यांची चलबिचल होत आहे. वादळात विझण्यापूर्वी दिवा जसा फडफड करतो. तशी बारणेंची ही फडफड सुरू आहे. पार्थ पवार यांच्या नावाने उठलेल्या वादळात हा दिवा कधी विझून जाईल हे त्यांना देखील कळणार नाही. बारणे यांनी लक्षात ठेवावे आगामी लोकसभेस परिवर्तन होणार असून, घड्याळाची टिकटिक वाजणार आहे. तेव्हा मात्र, बारणे यांना पवार कोण? याचे उत्तर निश्चितच मिळेल, असा उपरोधिक टोला या निम्मिताने साने यांनी बारणे यांना लगावला आहे.












