- आयुक्तांकडून खातेनिहाय चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी अपत्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. तसेच प्रशासन विभागाने वारंवार सूचना करूनही त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बजाविले आहेत.
श्रीनिवास दांगट हे महापालिकेमध्ये सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी २९ जुलै २०१३ रोजी महापालिकेने प्रशासन अधिकारी या पदावर भरतीसाठी सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सदर जाहिरातीनुसार दांगट यांना प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. जाहिरातीमधील अटीनुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. भरती प्रक्रियेनंतर दांगट यांच्याबाबत काही तक्रार अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. या तक्रार अर्जानुसार दांगट यांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुचविण्यात आले होते. प्रशासन विभागाकडून त्यांना वारंवार पत्रेही देण्यात आली होती. तसेच कारणे दाखवा नोटीसही देण्यात आल्या होत्या. यावेळी दांगट यांनी प्रतिज्ञापत्रासाठी वेळ मागून घेतला होता. १० जून २०२१ च्या पत्रान्वये प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही दांगट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.
यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी दांगट यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले असून आपण प्रतिज्ञापत्र सादर करत नसल्याने तक्रारदाराने नमूद केलेल्या तीन अपत्यांच्या तक्रारीस पुष्टी मिळत असल्याचेही आपल्या आदेशात नमूद केले आहे.