- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- शहरातून बदली झालेल्या तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ‘ मॅट’कडे धाव घेतली आहे. त्यांच्या रिक्त जागांवर पोस्टिंग देण्यात येऊ नयेत, असा आदेश मॅटने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, शहरांतर्गत नऊ पोलीस निरीक्षकांची विनंतीवरून बदली करण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत मंगळवारी (दि. ३१) रात्री उशिरा आदेश दिले. राज्यातील २९४ पोलीस निरीक्षकांची ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात बदली करण्यात आली. त्यात पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलाला १८ नवे पोलीस निरीक्षक मिळाले. तर, शहरातून नऊ पोलीस निरीक्षकांची बदली झाली.
त्यात सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे, शिरगाव पोलीस चौकीचे सुनील पिंजण तसेच गुन्हे शाखा युनिट एकचे अमर वाघमोडे यांची बदली झाली. या तीनही अधिका-यांनी मॅटकडे धाव घेतली. सांगवी पोलीस ठाणे व शिरगाव चौकी तसेच युनिट एक येथे नव्याने अधिकाऱ्यांची पोस्टिंग करण्यात आलेली नाही. राज्यातील सुमारे २०० पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १७ पोलीस निरीक्षकांच्या नावांची यादी देण्यात आली आहे. दरम्यान, शहर पोलीस दलात बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकांपैकी काही अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात येत आहे.












