- आरोपी अटकेत; एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शासनाची, पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला.
गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यासाठी रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास बालाजीनगर येथील आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुमच्याकडे बघून घेतो’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
सत्यशील सिद्धार्थ इंगोले (वय २७, रा. बालाजीनगर पावर हाऊस, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक गणेश महाडिक यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३, ५०४, ५०६ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.