- स्थायीचा कारभार तर, त्यांच्या अध्यक्षतेखाली बिनबोभाट सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे, आंदोलने करीत, स्थायी समिती बरखास्तीची मागणी लावून धरली. राष्ट्रवादीने आपल्या सदस्यांना स्थायी समितीच्या बैठकीत बहिष्कार घालण्यास सांगितले. १ सप्टेंबरच्या स्थायी समितीच्या सभेला राष्ट्रवादीचा एकही सदस्य हजर नव्हता; परंतु आठवडा उलटल्यानंतर सत्ताधारी भाजपने कारभार सुरू केला आहे.
एका सभेला गैरहजर राहिल्यानंतर आज बुधवारी (दि. ८) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेला राष्ट्रवादीचे ४ सदस्य हजर राहणार असल्याची माहिती राजू मिसाळ यांनी दिली. लाच प्रकरणानंतर भाजपचा निषेध सातत्याने केला आहे. तरीही भाजपने स्थायी समितीचा कारभार सुरू केला आहे; त्यामुळे आमचे सदस्य स्थायी समितीच्या सभेला उपस्थित राहतील, असे मिसाळ यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यावर लाचखोरीचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना अटक झाली व त्यातून त्यांची जामिनावर मुक्तताही झाली. त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बुधवारी (दि. १) रोजीची नियोजित ऑनलाइन साप्ताहिक सभाही पार पडली. मात्र या सभेला राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक गैरहजर होते. स्थायी समिती तर बरखास्त झालीच नाही; मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांनी एका सभेपुरते गैरहजर राहून काय साध्य केले, असा सवाल जाणकार नागरिक विचारत आहेत.












