शहरातील बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची. गौरी पूजन हा महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. या गौरींचे आवाहन उद्या रविवारी (दि. १२) सप्टेंबर रोजी होत आहे. या गौराईचे स्वागत करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूच्या खरेदीसाठी महिलावर्ग व्यस्त झाला आहे.
गौरी गणपतीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. गौराईचे मुखवटे खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. दुकानांमध्ये गौरीचे मुखवटे, रेडिमेड साडी आणि दागिने खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करत आहेत. सध्या बाजारात गौरींच्या कापडी, शाडू, पीओपी तसेच धातूच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अनेक सुबक, विविध आकाराच्या, आखीव रेखीव मुखवटे आणि सजलेल्या गौरी बाजारात लक्ष वेधत आहेत. मुखवट्यांची किंमत सुमारे ५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहे. मूर्तीसाठी लागणारे स्टॅडही बाजारात उपलब्ध आले आहेत. अखंडमुर्ती स्टॅडसह सुमारे तीन हजारांपासून उपलब्ध आहेत. तसेच यंदा फायबरचे गौरीचे मुखवटेही उपलब्ध आहेत. गौरीना लक्ष्मीहार, चपलाहार, मोहनमाळ, ठशी, बोरमाळ, राणीहार, मंगळसुत्र, मोत्यांचे दागिने. नथ, कंबरपट्टा, बांगड्या या दागिन्यांनी गौरींना सजवले जाते.
पारंपारिक म्हणून मोत्यांचे दागिने देखील आवर्जून वापरतात. तसेच मोहनमाळ, पुतळ्या, बोरमाळ, कोल्हापुरी साज यांना महिलावर्गाकडून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर आता गौरींसाठी खास पारंपरिक पद्धतीच्या रेडिमेड साड्याही बाजारात उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. यात नऊवार आणि सहावार अशा दोन्ही प्रकारच्या रेडिमेड साड्या उपलब्ध आहे. गौराईचे मुखवटे खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.