- शाडु माती व तुरटीचा वापर; आ. जगताप यांच्या हस्ते भाविकांना मूर्तीचे वाटप..
- भाविकांनी स्वच्छेने दिलेले दान समाजिक कार्यास प्रदान करणार – कुंदाताई भिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘ ती’ चा गणपती महोत्सवांतर्गत मूर्तीदान ‘ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात प्रदूषण रोखण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने शाडु माती व तुरटीपासुन तयार केलेल्या गणेश मूर्तीचे भाविकांना नुकतेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन जगन्नाथ काटे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, राजेंद्रनाथ जयस्वाल, राजु देवतारे, आर.के. पाटील, रमेश वाणी, जगन्नाथ वाळके आर्दीसह जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, महिला वर्ग व इतर नागरिक उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, उन्नती सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम खूपच समाजपयोगी व आपल्या पर्यावरणाशी पूरक आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत मूर्तीची कोणतीही किंमत न ठेवता नागरिकांकडून स्वच्छेने दानपेटीत रक्कम गुप्तदान करण्यात येते. हा उपक्रम शहरातीलच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गावागावात झाला तर आपला परिसर नक्कीच प्रदूषण मुक्त होईल. उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवते असे म्हणत फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे म्हणाल्या, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या या गणेश मूर्तींची किंमत न ठेवता ‘ ऐच्छिक दान ‘ पद्धत राबवली आहे. या मूर्ती घेऊन जाताना भाविकांनी स्वच्छेने ऐच्छिक काही रक्कम दिली आहे. भाविकांनी दान केलेली ही रक्कम वेलफेअर ट्रस्ट, पुणे यांना सुपुर्त करण्यात येणार आहे.