- मंडईच्या कामाला गती द्या; आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२१) :- पिंपरीतील भाजी मंडईची आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. तेथील नियोजित अद्ययावत मंडई प्रकल्पास गती देऊन मुदतीमध्ये काम पूर्ण करावे, अशी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.
साडेतीन एकर परिसरात मंडई आहे. सतरा वर्षापूर्वी येथील भाजी मंडईचे बीओटी तत्वावर बांधलेल्या जागेत स्थलांतर झाले. नियोजित बहुद्देशीय भाजी मंडईचा प्रस्ताव विकास आराखड्यात मंजूर झालेला असतानाही तो अनेक वर्षांपासून रेंगाळला होता. त्याबाबत आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पार्किंग इमारत, मच्छी, मटण, मसाला मार्केट परिसराची पाहणी आयुक्तांनी केली. नगररचना, भूमी जिंदगी, स्थापत्य, तसेच अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पिंपरी पोलिस चौकीशेजारी असलेल्या सव्वाएकरच्या शासकीय भूखंडाची शासनाकडे मागणी करून तो ताब्यात घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, भाजी मंडईचे अध्यक्ष लल्लुशेठ बोहाडे, आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगररचना उपसचालक प्रभाकर नाळे, मंगेश कोळप, सतीश इंगळे, रविंद्र पवार, उपअभियंता संजय खरात, ‘ग’ प्रभाग अधिकारी सुचित्रा पानसरे आदी उपस्थित होते.


















