- पालिका सभेत ऐनवेळच्या उपसूचनांद्वारे महत्वाच्या पदांना मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेत नव्याने पदे निर्मिती करून अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा धडाका सत्ताधारी भाजपने ठेवला आहे. महापालिकेच्या सोमवारच्या सभेतही सहआयुक्त, सहायक संचालक नगररचना, मुख्य अभियंता, वरिष्ठ स्वीय सहायक, लघुलेखक पदांची निर्मिती करून पदोन्नती देण्यास उपसूचनेद्वारे ऐनवेळी मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा विभागाकरीता संरक्षण दलाप्रमाणे योग्य समन्वय साधणे व प्रभावी कामकाज होण्यासाठी एकच वरिष्ठ नियंत्रित अधिकारी म्हणून सह आयुक्त ( आपत्ती सेवा ) पद निर्मितीस मंजुरी देण्यात आली. तसेच, अणुविद्युत व दूरसंचार विभागात रिक्त असलेल्या सहशहर अभियंतापदी कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. वरिष्ठ सहायक (गट अ) साठी २ पदे व लघुलेखक ( गट ब ) साठी ३ पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली.
महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नव्याने ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास शासनाकडे प्रस्ताव आहे. त्यामुळे वाढणारी लोकसंख्या व शहरीकरणाचा विचार करता महापालिकेच्या नगररचना व विकास विभागासाठी सहायक संचालक नगर रचना विभागासाठी आणखी एक पद निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली. संदेश खडतरे यांची सहायक संचालक नगररचनाम्हणून नियुक्तीस मान्यता देण्यात आली. तीन मुख्य अभियंता पुणे पालिकेच्या धर्तीवर पिंपरी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागामध्ये मुख्य अभियंता पदाची निर्मिती करून सुधारीत आकृतीबंधास सभेत मान्यता देण्यात आली.