- तांत्रिक अडचणींमुळे सभा ऑफलाईन घ्या; नगरसेवकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- महापालिकेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेत सदस्यांचा आवाज येत नसल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे महापौर ढोरे यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसन्सच्या माध्यमातून सोमवारी झालेल्या सभेसाठी पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्या दालनात उपस्थित होते.
तर, विरोधी पक्षातील काही नगरसेवक मधुकर पवळे सभागृहात उपस्थित होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कोण काय बोलत आहे हे समजत नव्हते. त्यातही महापौर ढोरे यांनी सभा कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहातून बाहेर पडत सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
नगरसेवकांनी महापौर दालनात प्रवेश केला. त्यापूर्वी सुरक्षारक्षकांनी महापौर दालनाबाहेर अडवल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांनी महापौरांना घेराव घातला. ऑनलाईन सभेमध्य काहीच समजत नसून ऑफलाईन सभा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. विषयांना दिलेल्या उपसूचना काय आहेत? त्या समजत नाही. आम्ही त्या वारंवार उपसूचना वाचण्याची मागणी करूनही तुम्ही रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी महापौर मंगला कदम व योगेश बहल यांनी केला. त्यानंतर महापौरांनी यापुढे सर्व उपसूचना वाचणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी महापौरांनी सभा १० मिनिटासाठी तहकूब केली. या वेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे माजी गटनेते राहल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक नाना काटे, पंकज भालेकर, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, पक्षनेते नामदेव ढाके,आदी उपस्थित होते.