- इच्छुकांचा जीव टांगणीला; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची निवडणूक एकसदस्यीय वॉर्डपद्धतीने घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून, ते काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला दोनसदस्यीय पद्धतीने निवडणूका घ्यायच्या आहेत. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २५ ऑगस्टच्या आदेशानुसार महापालिकेने एक सदस्य वॉर्डपद्धतीने कच्चा आराखडा करण्याचे कामकाज २५ सदस्यीय समितीमार्फत सुरू आहे. त्यासाठी सन २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात येत आहे. शहरातील ३ हजार १०२ गटांच्या आधारे वॉर्डरचना केली जात आहे. त्यामुळे वॉर्ड कसे असणार या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी दोन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत आग्रही आहे. त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होत नसल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांची प्रतिक्षा ताणली गेली आहे. तसेच, महापालिकेचे प्रशासन विभाग मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष देऊन आहे.