- चिखलीतील नवदुर्गा सखी मंचच्या रुपालीताई आणि पांडाभाऊ साने यांचे कौतुक..
- ‘घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२१) :- आजच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आरोग्य संरक्षणाची आवश्यकता भासत आहे. या सर्वात वाईट परिस्थितीसाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती कधी सांगून येत नाही आणि आलीच तर ती शारीरिक आणि आर्थिक नुकसान करते. विशेषतः एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे तुमच्या जवळ व्यापक आरोग्य विमा सुरक्षा असणे महत्वाचे आहे. ज्यामुळे आजारपणात हॉस्पिटलचा खर्च भागवताना तुमची कष्टाची कमाई खर्च होणार नाही आणि अनावश्यक कर्ज डोक्यावर वाढणार नाही. चिखलीतील नवदुर्गा सखी मंचच्या रुपालीताई आणि पांडाभाऊ साने यांनी ‘घरगुती गौरी-गणपती सजावट’ स्पर्धेच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती केली. विम्याचे महत्व लोकांना पटवून दिले. हे जनसेवकाचे एक आदर्शवत उदाहरण आहे, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांनी केले.
चिखली मोरेवस्ती प्रभाग १ मधील नवदुर्गा सखी मंच आणि पांडाभाऊ साने युवा मंचच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी ‘घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२१’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (दि. ३०) रोजी पांडाभाऊ साने यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने, नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपालीताई साने, प्रभागातील नागरीक आणि महिला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

गणेशोत्सवादरम्यान घरोघरी तयार केलेल्या गणेश व गौरी सजावटीसाठीची स्पर्धा १० ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान संपन्न झाली. स्पर्धेतील आकर्षक गौरी व गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. स्नेहल जाधव हिने पटकाविला तर, द्वितीय क्रमांक सौ. रुपाली धुमाळ, तृतीय क्रमांक सौ. वैशाली बावणकर आणि चतुर्थ क्रमांक कु. विक्रांत सोनटक्के याने पटकाविला आहे. विजेत्या प्रथम क्रमांकाला पाच लाख, द्वितीय क्रमांकाला तीन लाख, तृतीय क्रमांकाला एक लाख आणि चतुर्थ स्पर्धकालादेखील एक लाखांचा कॅशलेस मेडिक्लेम विमा प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजक पांडाभाऊ साने म्हणाले, प्रभागातील नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेशोत्सव व गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली होती. आमच्या परीक्षकांनी स्पर्धेतील सहभागी भक्तांच्या घरोघरी जाऊन सजावटीची पाहणी केली. आकर्षक सजावटी असणाऱ्या भाग्यवंतांचा पाच-तीन-एक लाखांचा कोरोनाच्या अनुषंगाने कॅशलेस मेडिक्लेम विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे इतर आजारांसोबतच या भाग्यवंत विजेत्याला कोरोना आजाराच्या खर्चापासूनही संरक्षण मिळणार आहे.
रूपालीताई म्हणाल्या, समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी – गणपती सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असतो. ही स्पर्धा नसून एक चळवळ आहे. प्रभागात अनेकांना गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची सवय या स्पर्धेमुळे लागली आहे. यंदा अनेक स्पर्धकांनी पर्यावरणपूरक सजावटींना महत्व दिले. या स्पर्धेमुळे गणेशोत्सवातील सजावटीबरोबरच दैनंदिन जीवनामध्येही अधिकाधिक पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. सोसायटीमध्येही जनजागृती होत आह्रे. खऱ्या अर्थाने हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव ठरला.
रुपालीताईच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व करणार नेतृत्व प्रभागात उदयास आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे मी स्पर्धेत सातत्याने सहभाग नोंदवत आहे. स्पर्धेमुळे मला मिळालेलं बक्षीस माझी व माझ्या कुटुंबाच्या वैद्यकीय आणि कोरोनासारख्या आजाराच्या खर्चापासून मुक्तता मिळवून देण्यात हातभार लावणार आहे.
– कु. स्नेहल जाधव ( प्रथम क्रमांक बक्षीस विजेती)…
पांडाभाऊ साने यांचे प्रभागात चांगले काम आहे. सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते नेहमीच सर्वाना मदत करीत असतात. गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सहभागी झालो आणि बक्षीसही मिळाले. स्पर्धेतील सजावटीच्या निमित्ताने नातेवाईकही घरी येतात. करोना संकटांनंतर विमा संरक्षण आणि सुरक्षा ही पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण बनली आहे. बक्षिसरुपी मिळालेला विमा आपत्कालीन परिस्थितीत व आर्थिक संकट टाळण्यासाठी मदतीला येणार असल्यामुळे मी व माझे कटुंबीय आनंदी आहे.
– सौ. रुपाली धुमाळ ( द्वितीय क्रमांक बक्षीस विजेत्या)…
















