- निगडीतील घटना; परिसरात दहशत, एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- घरी असताना फिर्यादीचा मित्र एक अल्पवयीन मुलगा घरी आला. बाहेर फिरायला जाऊ, असे म्हणून त्याने फिर्यादीला घराबाहेर नेले. अंकुश चौक येथील भाजी मंडईच्या पाठीमागे नेऊन मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मुख्य आरोपीने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी भाजी मंडई परिसरात दहशत निर्माण केली. त्या दहशतीमुळे लोकांनी त्यांची दुकाने व टपऱ्या बंद केल्या. निगडीतील ओटास्किम येथे मंगळवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
शहानवाज मुस्ताक शेख (वय १७, रा. ओटास्किम, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक पवार (वय २२, रा. ओटास्किम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















