- चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार यांनी सोसायटीत राहणाऱ्या महिलेवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवत, तिचे बेडरुममधील चित्रीकरण कैद केल्याची धक्कादायक घटना ५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी-वाकड रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली.
फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. या तीनही आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या बेडरुममधील चित्रीकरण होऊ शकेल, अशा पद्धतीने बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन सीसीटीव्ही लावले. ही महिला बेडरुममध्ये खासगी कपड्यांवर वावरत असताना या तिघांनी मिळून पाहिले. या सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत समजल्यानंतर हा कॅमेरा काढण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी त्यास नकार दिला.
पाळत ठेवून महिलेच्या खासगी कपड्यांवरील चित्रीकरण करणारे सोसायटीचे चेअरमन गणेश शंकर आवटे, सेक्रेटरी सागर शिंदे आणि खजिनदार देवेंद्र सारंगधर या तीन आरोपींवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.