- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- मावशीने शंभर रुपये न दिल्याने तरुणाने कुत्र्याच्या पट्टयाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. शगुनन कुमार पी (२५, रा. संत तुकारामनगर, मूळ रा. तामिळनाडू) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुनन हा बेरोजगार असून तो संत तुकारामनगर येथे मावशीकडे राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याने मावशीकडे शंभर रुपयांची मागणी केली; मात्र, मावशीने दररोज तुला कोठून पैसे देऊ, असे बोलून पैसे देण्यास मनाई केली. मावशीने पैसे न दिल्याने चिडलेल्या शगुनन याने राहत्या घराच्या वरच्या खोलीत जाऊन कुत्र्याच्या पट्टयाने गळफास घेतला.
शगुनन हा मागील काही दिवसांपूर्वी व्यसनाच्या आहारी गेला होता. शगुनन याच्या भावाने देखील आठ महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.