न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- वन्यजीव सप्ताहाच्या दिवशी दुर्मिळ जातीच्या पांढऱ्या रंगाच्या तस्कर सापाला सर्पमित्रांमुळे जीवदान मिळाले आहे. दिघीतील वाळके मळा येथे पांढरा (अल्बीनो) साप सर्पमित्रांनी पकडला. तीन फूट लांबीच्या सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले आहे.
दिघीतील एकाला वाळके मळा येथे फेरफटका मारत असताना पांढरा तस्कर साप दिसला. त्यानंतर त्यांनी लगेच सर्पमित्रांशी संपर्क साधला. तसेच, सापाबद्दल माहिती दिली. तीन फूट लांबीचा तस्कर जातीचा हा साप परिसरात पहिल्यांदा आढळून आला असल्याचे सर्पमित्र यांनी सांगितले.
सर्पमित्र अमर गोडांबे, दीपक बनसोडे, अलताफ सय्यद, विक्रम भोसले व अभिषेक फुलारी यांनी सापाची माहिती वनपाल राठोड यांना दिली. त्यानंतर सापाला जंगलात सोडून देण्यात आले. रंगद्रव्यांच्या अभावाने अल्बीनो पांढरा तस्कर जातीचा साप हा बिनविषारी आणि अत्यंत दुर्मिळ आहे.