पिंपरी (दि. १५ जाने.) :- ताथवडे ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्याबद्दल पैलवान बाला रफिक शेख यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने शेख यांना १ लाख ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
यावेळी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पवार, उद्योजक राजाभाउ पवार, वस्ताद जालिंदर फेंगसे, वस्ताद संदूभाउ कोळी, संतोष रिठे आदी उपस्थित होते.
बुलढाण्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत उतरणारा बाला रफीक हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा आहे. घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते. गेल्या पाच पिढ्या कुस्तीची परंपरा या शेख कुटुंबीयांनी जोपासली. वडील आझम शेख यांनी मुलांच्या कुस्तीसाठी गांभीर्याने मेहनत घेतली.
बाला रफीक हा त्यांचा तिसरा मुलगा. पहिल्या दोन मुलांनीही कुस्तीमध्ये नशीब अजमावून पाहिले. परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मग शेख कुटुंबीयांनी बाला रफीकच्या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. शेख कुटुंबियांच्या अपार मेहनतीचे आणि जिद्दीचे यश आता त्यांना मिळाले आहे. महाराष्ट्राची संस्कृती असलेला कुस्ती हा क्रीडा प्रकार टिकला पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.











