- परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त – पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- पुणे जिल्ह्यात धार्मिकस्थळे खुली होणार आहेत. मावळातील श्री एकवीरा देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिर उघडण्याच्या दिवसापासून देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून विशेषतः कोकण प्रांतातून मोठ्या संख्येने भाविक गडावर येण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर एकवीरा देवी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, यंदा एकवीरा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे पोलीस ग्रामीण निरीक्षकांच्या माध्यमातून गडावरील संदर्भातील बाबीची पाहणी करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ, वेहेरगाव ग्रामपंचायत, देवीचे पुजारी, गुरव यांची बैठक घेण्यात आली आहे. तहसीलदार यांनीही गड परिसरात सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी येणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, वाहतूक कोंडीच्या समस्येने पर्यटक त्रस्त होतात. येथील पर्यटक व्यवसाय कायम राहण्यासाठी शहरातील प्रशासनाने व नागरिकांनी रस्ते मोकळे कसे राहतील. यासाठी प्रयल करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वन वे, पार्किंग सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.