- रात्री-अपरात्री येथे अपघाताची शक्यता..
- टेंडरमधील मलईसाठी दर्जाहीन काम?; नागरिकांमधून नाराजगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपुलावरून निगडी प्राधिकरणाकडे जाताना रस्त्यावर छोटे सिमेंटचे नव्याने बसविण्यात आलेले काळे गट्टू (बोलार्ड) काही दिवसातच लगेच तुटून पडले आहेत.
सुशोभीकरण झाल्यामुळे रस्त्याची शोभा वाढली होती. नागरिकसुद्धा पालिका प्रशासनाचे आभार मानत होते; पण काही दिवसातच पालिकेच्या कामाचा पोल-खोल झाला आहे. फक्त आणि फक्त खर्च दाखविण्यासाठी आणि टेंडरमधील मलईसाठी गरज नसताना अशा प्रकारचे हीन दर्जाचे गट्टू बसविण्यात आले असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. या रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी असून, सारखी वाहनांची ये-जा सुरु असते. रस्त्यावरुन पडलेले हे गट्टू पाहताच हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे स्पष्ट होते. रात्री-अपरात्री या गट्टूला धडकून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.
या गट्टूवरील प्लॅस्टिक कव्हरदेखील निघालेले नसताना ते तुटून पडल्यामुळे पालिकेच्या कामाचा दर्जा काय आहे? याची जाणीव होते. या निकृष्ट कामामुळे करोडो रुपये खर्चून उभारलेल्या उड्डाणपुलाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रस्त्यावर हे गट्टू का बसविण्यात आले? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.














