- वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख व सांगवीचा पाणीपुरवठा सुधारणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, ०६ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा भविष्यात २४ तास करण्याबाबत तसेच २४ x ७ योजनेअंतर्गत प्राधिकरण से. २५ येथे प्रायोगीक तत्वावर सुरु केलेल्या २४ तास पाणीपुरवठ्याबाबत निगडीतील से. क्र. २३ जलशुध्दीकरण केंद्र येथे आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, नगरसदस्य सागर आंगोळकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रविण लडकत, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक अडसुळ व उपअभियंता वर्ग उपस्थित होता.
प्राधिकरण से. २५ येथे २४ तास पाणीपुरवठा चालु झाल्यानंतर त्यातून आलेला अनुभव, पाण्याची बचत तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया इ. बाबत सादरीकरण करणेत आले. २४ x ७ योजनेअंतर्गत से.क्र. २३, निगडी पासुन डांगे चौकापर्यंत नव्याने १००० मिमी व्यासाची पाईप लाईन टाकणेत आली आहे. या पाईपलाईनमुळे वाकड, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि सांगवी भागांचा पाणीपुरवठा सुधारणार आहे. याशिवाय शहरात २४ x ७ योजना व अमृत योजनेअंतर्गत नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलणेत आले असुन त्याठिकाणी एम.डी.पी.ई पाईप लाईनचे कनेक्शन करण्यात आले आहे त्यामुळे पाण्याची गळती कमी होऊन पाण्याची बचतही होणार आहे. नागरिकांनी १३५ LPCD या मानांकाप्रमाणे पाणी वापरणे कामी जनजागृती करण्याबाबत आमदार यांनी सुचविले. याशिवाय मनपा अंतर्गत येणा-या मोठमोठ्या सोसायट्या यांचे Water Audit केल्यास पाण्याची गळती निदर्शनास येईल या बाबतही त्यांनी सुचना केल्या.
बैठक झाल्यानंतर महापौर व आमदार यांनी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमतावाढीच्या प्रकल्पाची व टप्पा १ येथील ८० लक्ष लिटर क्षमतेच्या चालु असलेल्या शुध्द पाण्याच्या टाकीच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली व तद्दनंतर वृक्षारोपण केले.