- मंदिर उघडल्याने शहरातील भाविकांचा जीव भांड्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- शहरात उत्साही वातावरणात गुरुवारी (दि. ७) शारदीय नवरात्राचा प्रारंभ घटस्थापनेने होत आहे. पुढील ९ दिवस महिला हा सण आनंदाने साजरा करतील. पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत अनेकजण उपवास करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. मात्र, दुसरीकडे मंदिरे खुली होत असल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी आश्विनी शुक्ल प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. या निमित्ताने घराची साफसफाई केली जाते. पहिल्या दिवशी कलश स्थापन करून विधिवत पूजा केली जाते. देवीची प्रतिमा अथवा मूर्ती स्थापन करून पूजाअर्चा केली जाते. काही ठिकाणी परांपरागत कुळाचारानुसार घटस्थापना केली जाते. तर, कलश न ठेवता ९ दिवस उपवास धारण करण्याचीही पद्धत आहे.
देवघरामध्ये दिवसरात्र समई तेवत ठेवली जाते. नवरात्रात उपवासाचे पदार्थ देवीला अर्पण करण्यात येतात. दरम्यान, घटस्थापनेच्या आदल्या दिवशी खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग दिसून आली. बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. आज गुरुवारपासून मंदिरेही खुली झाली असल्याने मंदिरातही उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
















