- मुलीचा अपघात झाल्याचे खोटे सांगून उकळले होते पैसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- भाजपचे नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावद्वारे फोन करून मुलीचे नाव घेऊन तिच्या डोक्यावरून ट्रक गेला असून तिला उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.
कांबळे यांनी त्यांच्या पत्नीला ही हकीकत सांगितली. त्यानंतर कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईल फोनवरून गुगल पेच्या माध्यमातून आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर ६५०० रुपये पाठवले होते. त्यानंतर आरोपीने आणखी १० हजार रुपयांची मागणी केली होती. कांबळे यांना संशय आल्याने त्यांनी वायसीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन फोनवरील व्यक्तीने सांगितलेल्या भाग्यश्री बाविस्कर नावाच्या रुग्णाबद्दल चौकशी केली. त्यावेळी अशा नावाचा कोणताही रुग्ण रुग्णालयात नसल्याची माहिती कांबळे यांना मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी आरोपीला नाशिकमधून अटक केलेली असून सुरज वाघ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने याआधी आणखी चार नगरसेवकांकडे अशाच पद्धतीने पैसे मागितले होते. त्याबाबत मात्र कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे त्याचे फावले होते.
















